नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून हाकला   

काँग्रेस आमदारांचे विधानभवनात आंदोलन

मुंबई, (प्रतिनिधी) : औरंगजेबाची कबर, मल्हार हिंदू मटण सारखे मुद्दे उपस्थित करून व प्रक्षोभक वक्तव्ये करून मंत्री नितेश राणे राज्यात अशांतता पसरवत आहेत. जाती-धर्मात वाद निर्माण करण्याचे उद्योग करत आहेत. त्यांची तत्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी करत काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणा देत आंदोलन केले. त्याचवेळी औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करणार्‍या शिवसेना आमदार व विरोधकांमध्ये घोषणायुद्ध सुरू झाल्याने वातावरण तापले होते.
 
औरंगजेबाची कबर, मल्हार हिंदू मटण आदी मुद्द्यावर मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत, वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. मंत्री असूनही बेताल वक्तव्ये करणार्‍या नितेश राणे यांची हकालपट्टी करा, अशी विरोधकांची मागणी आहे. त्यासाठी काल सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर फलक फडकवत घोषणा दिल्या. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तेथे औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीसाठी पायर्‍यांवर आंदोलन करत होते. त्यामुळे यावेळी त्यांच्यात घोषणायुद्ध सुरू झाले होते. हे घोषणायुद्ध हातघाईवर येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकांचे प्रयत्न सुरू होते. 

मुख्यमंत्र्यांची तंबी; मात्र इन्कार!

प्रक्षोभक वक्तव्ये करून वाद निर्माण करणार्‍या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दालनात बोलावून समज दिल्याची चर्चा काल विधानभवनात होती. नितेश राणे यांनी मात्र, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझी नाव आहे, त्यामुळे मला तंबी देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत याचा इन्कार केला. नागपूरला पोलिसांवर हल्ला करण्यात आला. असा प्रकार घडल्यानंतर आमचे देवाभाऊंचे सरकार गप्प बसेल का? संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

शिवसेना आमदारांचे आंदोलन 

छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर छळ करणार्‍या औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी काल विधान भवनातील पायर्‍यांवर घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनात मंत्री भरत गोगावले, प्रकाश आबिटकर हे ही सहभागी झाले होते.
 

Related Articles